.. अन सुनेने सासूची तीन बोटे तोंडात धरली , आता प्रकरण पोलिसात

Spread the love

सासु सुनामधील भांडण हा काही नवीन विषय नाही मात्र किरकोळ कारणावरून देखील अनेकदा कायदा हातात घेतला जातो. अंबरनाथ इथे अशीच एक घटना उघडकीला आली असून टीव्ही बंद केला म्हणून संतप्त झालेल्या सुनेने सासूच्या हाताच्या बोटांचा चावा घेतल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अंबरनाथ पूर्व येथील वडवली सेक्शन परिसरात ही घटना उघडकीला आली असून सकाळी साडे अकराच्या सुमारास सासु वृषाली कुलकर्णी यांचे स्तोत्रपठण सुरू असताना त्यांची सून असलेली विजया कुलकर्णी हिने जाणीवपूर्वक टीव्हीचा आवाज वाढवला त्यामुळे संतप्त झालेल्या सासूने टीव्ही बंद केला तेव्हा सुनेने ‘ हे घर माझे आहे मी पाहिजे ते करेल ‘ असे म्हणत अरेरावी केली.

सासूने देखील यावेळी ‘ हे घर तुझे नाही तर माझ्या मुलाचे आहे ; असे सांगितले तर सुनेने देखील ‘ हे माझ्याही नवऱ्याचे घर आहे ‘ असे सासूला सांगितले. त्यांच्या भांडणाचे झटापटीत रूपांतर झाले आणि त्यानंतर सासूच्या उजव्या हाताची तीन बोटे सुनेने तोंडात धरली आणि कडकडून चावा घेतला. नवरा मध्ये पडला त्यावेळी त्यालादेखील बायकोने शिवीगाळ केली आणि मारहाण केली. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस हवालदार वाघमारे तपास करत असल्याचे समजते.


Spread the love