
अनेक लोक व्हाट्सएप्प स्टेटसचा वापर करून आपल सध्या काय चाललंय ? हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र सोलापूर येथील एका युवकाला हा प्रयत्न चांगलाच अंगलट आला असून त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नजीक असलेल्या पेनूर येथील एका नऊ वर्षांच्या लहान मुलीबरोबर बालविवाह करून देवकार्यासाठी तीर्थक्षेत्राला गेलेल्या कोन्हेरी येथील नवरदेवासह आई, वडील व मुलीची आई अशा चार जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पेनूर येथील मामाच्याच एका अवघ्या नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर 30 नोव्हेंबर रोजी कोन्हेरी येथील नात्यातीलच अविनाश दाजी शेळके याने मुलीची आई व आपले आई – वडील यांच्या संगनमताने बालविवाह केला. सर्वजण नात्यातील असल्याने या प्रकारची कुठे वाच्यता करण्यात आली नाही मात्र विवाह झाल्यावर सर्वजण देवदर्शनाला निघाले त्यावेळी नवरदेवाला राहवले नाही आणि त्याने व्हाटसऍप्पवर स्टेटस काही फोटोसोबत अपडेट केले.
नवविवाहित देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्राला गेले असताना ठिकाणचे काही फोटो नवरदेवाने त्याच्या मोबाईलवर ‘आय लव्ह बायको’ असे लिहून फेसबुकसह व्हाट्सएप्प स्टेटसला ठेवले होते. त्याच्या या फोटोचा स्क्रीनशॉट काढत अज्ञात व्यक्तीने सोलापूर येथील महिला व बाल विकास कार्यालयातील चाईल्ड लाइन 1098 या संपर्क क्रमांकावर फोन करत या बालविवाहाची माहिती दिली आणि यंत्रणा कामाला लागली.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, सदस्य योगेश स्वामी, दत्तात्रय शिर्के यांच्या पथकाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहोळ पोलिस ठाण्याशी संपर्क केला आणि झालेल्या प्रकाराची खात्री होताच दाजी भीमराव शेळके, तारामती दाजी शेळके व नवरदेव अविनाश दाजी शेळके तसेच पीडित मुलीची आई यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये अतुल वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीची आई व पीडित मुलगी सध्या फरार झाल्या असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.