‘ काय डोंगर काय दांडा ‘ म्हणणाऱ्या नगरसेविका शिंदे गटात सामील

Spread the love

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर बंडखोर आमदारांचा कडक शब्दात समाचार घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे ह्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या आहेत त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडत केंद्र सरकारच्या निशाण्यावर मुंबई महापालिकेतून शिवसेना हद्दपार करणे आहे हे आता लपून राहिलेले नाही त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांना देखील आपल्या गळाला लावत मुंबई महापालिका काबीज करण्याचे भाजपचे स्वप्न दिसून येत आहे.

शिवसेनेत आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शीतल म्हात्रे यांनी बंडखोर आमदारांवर ‘ काय डोंगर काय दांडा ‘ अशा शब्दात जोरदार टीका केली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील शीतल म्हात्रे यांचा उल्लेख अग्नीकन्या असा देखील केला होता मात्र अचानकपणे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देत शिवसेनेला मोठा धक्का दिलेला आहे. शीतल म्हात्रे ह्या युवासेनेच्या म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्त्या आहेत . 2012 आणि 2017 या दोन्ही निवडणुका दहिसर इथे जिंकून त्या नगरसेविका झाल्या होत्या. शिवसेनेच्या निष्ठावंत म्हणून त्यांचा उल्लेख आहे मात्र अचानकपणे त्यांनी भूमिका बदलल्याने शिवसेनेत खळबळ उडालेली आहे.

अचानकपणे अशा पद्धतीने घुमजाव केल्याने त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, ‘ ज्यावेळी बंडखोर नेते हे महाराष्ट्राबाहेर होते त्यावेळी त्यांची भूमिका आमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचली नव्हती मात्र आता हे नेते मुंबईत दाखल झाल्याने त्यांचे म्हणणे आम्ही व्यवस्थितपणे समजावून घेतले आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मी एकनाथ शिंदे गटात सामील झालेली आहे, ‘ असे त्यांनी सांगितले.


Spread the love