कौतुकास्पद ..राजकीय हस्तक्षेप अन धमक्यांना न जुमानता पोलिसांनी केले गुन्हे दाखल

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आली असून गावठी पिस्तुल आणि गुप्तीचा धाक दाखवत लोकांना ठार मारण्याची धमकी देत त्यांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून आरोपींकडून दोन लाख वीस हजारांचा माल देखील हस्तगत करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार सागर अरुण कांबळे ( वय 22 राहणार न्यू बुधवार पेठ भिम विजय चौक सोलापूर ), बुद्धभूषण नागसेन नागटिळक ( वय 36 राहणार न्यू बुधवार पेठ सोलापूर ), सतीश उर्फ बाबुलाल अर्जुन गायकवाड ( वय 25 राहणार न्यू बुधवार पेठ सोलापूर ) अक्षय प्रकाश थोरात ( वय 26 राहणार न्यू बुधवार पेठ सोलापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.

पोलीस पथकाला गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही तरुण जुना तुळजापूर नाका ते रुपाभवानी मंदिर दरम्यान येणाऱ्या लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडून लूटमार करत आहेत, अशी बातमी समजली त्यानंतर पोलिस पथकाने रुपाभवानी मंदिराकडून जुना तुळजापूर नाका येथे जाणाऱ्या सर्विस रोडवर सापळा रचला होता त्यानुसार आरोपींना पकडण्यात आले.

पकडण्यात आलेले चार जण आणि त्यांचे साथीदार रस्त्याने जाणाऱ्या लोकांना धाक दाखवत दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी द्यायचे आणि त्यानंतर त्यांना विवस्र करून अनैसर्गिक अत्याचार करण्यास भाग पाडायचे असेदेखील समोर आलेले आहे. अशा स्वरूपाचे व्हिडिओ बनवून ते एकमेकांमध्ये व्हाट्सअप वर शेअर करत होते. अटक केलेल्या चार जणांची आधीपासूनच गॅंग कार्यरत असून त्यामध्ये 15 ते 16 तरुणांचा समावेश आहे .

अटक केल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी काही राजकीय पुढारी पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. ‘ गुन्हा दाखल दाखल करू नका. काय ते आपण मिटवून घेऊ ‘, अशी देखील ऑफर त्यांनी पोलिसांना दिली होती मात्र पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही म्हणून त्यांनी पुढे तुम्हाला कधी तरी अडचण येईलच अशा स्वरूपात धमकीवजा इशारा देऊन ते पोलिस ठाण्यातून निघून गेले मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींची इतर काय काय गुन्हे केले आहेत याचा शोध घेत आहेत.


Spread the love