गोव्याला म्हणून नेलं अन मुलांना भीकेला लावलं , काजलमावशी ताब्यात

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या कोल्हापुर इथे समोर आलेले असून अवघ्या बारा वर्षांच्या सातवीत शिकणाऱ्या भीमा आणि रूपाली नावाच्या दोन मुलांचे एका ओळखीच्या महिलेने भिक मागण्याच्या उद्देशाने अपहरण केले आणि हैदराबाद इथे नेऊन रेल्वे स्टेशनवर त्यांना भीक देखील मागण्यास भाग पाडले.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला त्यांना त्यांच्या घरी फोन करू देत नव्हती मात्र चलाख असलेला भीमा या मुलाने एका प्रवाशालाच विनंती केली आणि त्यानंतर घरी फोन लावल्यानंतर घरच्या लोकांनी पोलिसांना कळवत अखेर हैदराबाद येथून दोन मुलांची सुखरूपरीत्या सुटका करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या मुलांना घरचा नंबर तोंडपाठ असल्याकारणाने त्यांची सुटका झालेली आहे. काजल सूर्यवंशी असे याप्रकरणी मुख्य आरोपी महिलेचे नाव आहे.

काजल हिला पतीने सोडून दिल्यानंतर भिक मागून ती उदरनिर्वाह करत होती. तिचे वय 35 वर्ष असून आरोपी महिला ही कोल्हापुरातील कनाननगर इथे राहत होती. लहान मुले सोबत असली तर भावनिक होऊन लोक जास्त भीक देतात हे तिला माहीत असल्याकारणाने तिने परिसरात राहणारा भिमा ( वय १२ ) आणि रूपाली ( वय 11 ) यांचे अपहरण केले . आपण गोव्याला फिरून येऊ असे सांगत तिने त्यांना सोबत घेतले आणि हैदराबाद इथे भीक मागण्यास प्रवृत्त केले.

आरोपी महिला ही हैद्राबाद इथे पोहोचली आणि तिने या मुलांना भीक मागण्यास सांगितले आणि स्वतः मात्र त्यांच्या पैशावर उपजीविका केली. लहान मुलांना तिने उपाशी ठेवण्याची देखील धमकी दिली. रेल्वे स्थानकातील बाकड्यावरती त्यांना झोपण्यास भाग पाडायची. तिथेच नळावर हातपाय धुवून हे सर्वजण तिथे राहत होते.

भीमा आणि रूपाली हे तिला मावशी म्हणत असायचे मात्र या मावशीने फसवून आणून भिक मागायला लावली हे चिमुरड्या भीमाला पटत नव्हते त्यातून त्याने काही जणांना आपली कैफियत सांगितली मात्र दुर्दैवाने त्याच्याकडे देखील काही जणांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. काजलच्या तावडीतून सुटण्यासाठी कुठलाच मार्ग राहिला नाही त्यावेळी मात्र एक व्यक्ती समोर आला आणि त्याने भीमा याचे घरच्यांशी बोलणे करून दिले त्यानंतर तात्काळ कोल्हापूर पोलिसांचे पथक हैदराबादला रवाना झाले आणि दोन्ही अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली तर आरोपी काजल सूर्यवंशी हिला ताब्यात घेण्यात आले. शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर , उपनिरीक्षक चव्हाण, लखन पाटील , महिला कॉन्स्टेबल विशाखा पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे.


Spread the love