
महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून ज्या मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला असे सांगत सावत्र बाप गावभर फिरत होता तोच मुलगा अचानक प्रकट झाल्याने या बापाची चांगलीच भंबेरी उडाली. ‘ आपला मुलगा हा कोरोनाने मयत झाला ‘ अशी आवई या बापाने उठवली होती मात्र तोच मुलगा तीन महिन्यांनी पुन्हा प्रकट झाला. ज्याचा विधीवत दहावा व तेरावा केला तोच प्रकट झाल्याची चर्चा औरंगाबाद इथे जोरदार रंगलेली आहे .
उपलब्ध माहितीनुसार , वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील ओमसाईनगरात राहणाऱ्या गोपाल सोनवणे (वय ५०) याच्या दुसऱ्या पत्नीचा पहिल्या पतीपासून झालेला विनायक हा मुलगा गतिमंद आहे. आता त्याचे काही करणे आपल्याला शक्य होत नाही म्हणून कोरोना काळाचा फायदा घेत या गतिमंद मुलाला सावत्र पित्याने घाटीत नेऊन सोडले आणि कोरोनात त्याचा मृत्यू झाला असे सर्वाना सांगितले. कोरोनाने मृत झालेल्याचा मृतदेह घरी देत नाही, असे पत्नी व गल्लीत सर्वांना सांगून मुलाचा विधीवत दहावा व तेरावा देखील केला. त्याने केलेले हे कांड कोणाच्या लक्षात आले नाही .
आज उद्या करत करत असे तब्बल तीन महिने उलटले मात्र काही मुले घाटीत रिपोर्ट आणण्यासाठी गेले असता गतिमंद मुलगा त्यांना तिथे भेटला. मुलांना शंका आल्याने त्यांनी तिथे त्याच्यासोबत फोटो कडून तो फोटो गल्लीत दाखवला असता तो जिवंत असल्याची खात्री झाली आणि त्यानंतर अमोल शेवंतकर, शुभम दुसंगे, शेख हाफीस आणि संतोष पडघन हे त्याच्या वडिलांनाच घाटीत घेऊन गेले असता वडिलांना पाहून मुलगा वडिलांच्या गळ्यात पडला.
वडिलांनी केलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर गतिमंद विनायक व त्याचे वडील गोपाल सोनवणे यांच्यासह इतर व्यक्तींनी पोलीस ठाणे गाठले असता वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी स्वतःच्या खिशातून हजार रुपये काढून दिले आणि मुलाचा नीट सांभाळ करण्यास बजावले. मुलाचे वडील सोनवणे यांनी देखील झाल्या प्रकरणी माफी मागितली आणि यापुढे असा प्रकार आपल्याकडून होणार नाही असे आश्वासन दिले.