
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून 64 वर्षीय निवृत्त असलेल्या बँक अधिकाऱ्याला सेक्सटॉर्शन शिकार बनवण्यात आलेले आहे. मुंबई येथील ही घटना असून आरोपी व्यक्तींनी सर्वप्रथम या अधिकाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्यांना अश्लील व्हिडिओ कॉल करून हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन तब्बल 17 लाख 80 हजार रुपये लंपास केले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, सदर व्यक्ती हे 2019 मध्ये एका सरकारी बँकेतून निवृत्त झालेले होते. गुजरात येथील आपण रहिवासी आहोत असे सांगत एका महिलेने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्यांच्यात व्हाट्सअपवर बोलणे सुरू झाले. हळूहळू या महिलेने त्यांच्याशी गोड गोड बोलत त्यांची आर्थिक परिस्थिती वगैरे इतर सर्व माहिती काढली आणि एकेदिवशी त्यांना रात्री एकच्या सुमारास नग्नावस्थेत कॉल केला. अचानकपणे तिचा कॉल आल्यानंतर सदर व्यक्ती यांना धक्का बसला आणि त्यानंतर तिने हा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.
तुम्ही मला नको त्या अवस्थेत तुम्ही पाहिलेले आहे. मी पोलिसात जाऊन तक्रार देईल असे सांगत त्यांना तिने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. दहा हजार रुपये आत्ताच्या आत्ता द्या नाहीतर हा व्हिडीओ युट्यूबला टाकून देईल आणि पोलिसात देखील तक्रार देईल अशी तिने धमकी दिली. पीडित अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केले मात्र त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी त्यांना विक्रम राठोड असे नाव सांगत दिल्ली येथील सायबर सेलमधून बोलत आहोत असे सांगितले गेले अन त्यानंतर या विक्रम राठोड याने तुमच्या विरोधात दिल्ली सायबर पोलीसात तक्रार दाखल झालेली असून तुम्हाला मुंबईत येऊन बेड्या ठोकून दिल्लीला घेऊन जाण्यात येईल असे धमकावले. त्यानंतर ट्रू कॉलरवर त्याचा पोलिसाच्या वेषातला फोटो देखील पाहिल्यानंतर सदर प्रकरण गंभीर असल्याची तक्रारदार यांची खात्री पटली.
विक्रम राठोड याने त्यानंतर या अधिकाऱ्याला वेळोवेळी पैसे देण्यास भाग पडत आत्तापर्यंत तब्बल साडे सोळा लाख रुपये त्यांच्याकडून काढून घेतले त्यानंतर विक्रम राठोड याने पुन्हा एकदा या अधिकाऱ्याला फोन केला त्या वेळी पीडित महिलेने तुमची व्हिडिओ क्लिप ही युट्युब वर प्रकाशित करण्यात आलेले आहे तुम्हाला रणवीर गुप्ता नावाचा व्यक्ती त्यासंदर्भात फोन करेल असे सांगितले.
रणवीर गुप्ता याने फोन करून पुन्हा या अधिकार्याकडून एक लाख तीस हजार रुपये उकळले. प्रकरण आता तरी थांबेल अशी त्यांना आशा होती मात्र एके दिवशी राठोड याने पुन्हा फोन केला आणि ज्या महिलेचा व्हिडीओ तुम्ही पाहिला तिने आत्महत्या केलेली आहे. तिचे वडील पैसे मागत आहेत असे सांगत पुन्हा एकदा पैसे मागण्यास सुरुवात केली त्यानंतर मात्र निवृत्त अधिकारी यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात गाठून गुन्हा नोंदविला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत .