‘ तो ‘ मेसेज आला तेव्हा चक्क आयुक्त देखील समोरच , सायबर पोलीस आले अन..

Spread the love

मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट तयार करायचे आणि त्यानंतर त्यांचा समाज माध्यमांमधील फोटो जोडून त्यांच्या नावाने पैसे मागणे सुरू करायचे असे प्रकार गेल्या काही दिवसात उघडकीला येत आहेत. पोलीस दलातील सक्षम अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या नावाने देखील असा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. आता दुसरा प्रकार नाशिक महापालिकेत रुजू झालेले आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सोबत घडलेला असून त्यांनी यासंदर्भात सायबर पोलिसात फिर्याद दिलेली आहे तसेच या भामट्याच्या नंबरवर कोणीही प्रतिसाद देऊ नये, असे देखील त्यांनी आवाहन केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर प्रकार हा आता फेसबुकवर नव्हे तर व्हाट्सअपवर घडलेला असून एका वेगळ्याच नंबर वरून मेसेज पाठवून लिंकवर क्लिक करून पेमेंट मागण्यात आले होते. सदर भामट्यांनी आपल्या प्रोफाइलला चक्क चंद्रकांत पुलकुंडवार यांचा फोटो लावला होता आणि त्यानंतर त्याने असा प्रकार केल्याने पुलकुंडवार यांच्या परिचयाच्या नागरिकांनी त्यांना या प्रकाराची कल्पना दिली तेव्हा हा सगळा प्रकार लक्षात आला.

काही महापालिका अधिकाऱ्यांना असे मेसेज आले तेव्हा आयुक्त देखील त्यांच्या समोरच बसलेले होते. आपल्याच नावाने हा प्रकार सुरू असल्याने आयुक्तांना देखील धक्काच बसला. त्यांनी पोलिस उपायुक्त यांच्याशी चर्चा करून सायबर पोलिस ठाण्याच्या काही अधिकाऱ्यांना महापालिकेत बोलावून घेतले आणि त्यानंतर तक्रार दाखल केली. सदर क्रमांक 9834246263 हा असून हा नंबर पुणे येथील एका व्यक्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे मात्र हा नंबर हॅक झाल्याप्रकरणी या व्यक्तीने याआधीच पोलिसात तक्रार दिली आहे. आपल्या नावाने कोणीही काही पैसे मागितले तर ते देऊ नयेत असे देखील आयुक्त यांनी आवाहन केले आहे.


Spread the love