
कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या वर्तनामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत असाच एक आणखी प्रकार मुंबई येथे नुकताच घडला होता. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर निधीच्या उपलब्धतेच्या कारणावरून विशेष कार्यकारी अधिकारी बालाजी खतगावकर यांच्यावर सत्तार यांनी आक्षेपार्ह भाषेत तोंडसुख घेतलेले होते. सत्तार यांच्या तोंडी ही भाषा ऐकल्यानंतर उपस्थित असलेले इतर मंत्री आणि आमदार देखील खजील झाले होते.
खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सभा अब्दुल सत्तार यांची समजूत घातली आणि झाल्या प्रकाराबद्दल बाहेर कोणीही बोलू नये असे देखील सांगितले मात्र अवघ्या काही मिनिटात प्रसारमाध्यमांना हे वृत्त समजले आणि त्यानंतर असे काही घडलेले नाही तुमची माहिती निराधार आहे असे बंडखोर गटाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले मात्र तोपर्यंत या विषयाची जोरदार चर्चा सुरू झालेली होती.
निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत पक्षाचे नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळेल असा बंडखोर गटाचा अंदाज होता मात्र निवडणूक आयोगाने त्यांना चकवा दिला त्यामुळे आता नवीन चिन्ह आणि नवीन नाव शोधावे लागणार असल्याने बंडखोर गटात चिंतेचे वातावरण होते.
पावसाळ्यानंतर मंजूर विकासकामे केली जातात मात्र सरकारच्या तिजोरीत अपेक्षित निधी नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि एकदा आचारसंहिता सुरू झाली की कामेही सुरू करता येणार नाहीत अशा परिस्थितीत ‘ ना पक्ष ना निवडणूक चिन्ह अन ना निधी तर करायचे काय ? ‘ या चिंतेतून अब्दुल सत्तार यांनी संताप व्यक्त केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र सत्तार कोणाचेच बोलणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अब्दुल सत्तार यांनी माझा आवाज मोठा आहे म्हणून मी बोललो मात्र हंगामा केला गेला अशी चर्चा बाहेर झाली असे सांगत सारवासारव केली आहे.