
महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात देवगाव नजीक बर्ड्याची वाडी येथे अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह त्र्यंबकेश्वर येथील महिला व बालकल्याण विभागाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आलेला आहे. दहावीच्या परीक्षेला ती गैरहजर राहिली म्हणून शिक्षिकेने विचारणा केली आणि त्यानंतर सूत्रे हलली.
बर्ड्याची वाडी येथे भाऊ बहिणीचा विवाह एकाच मांडवात शुक्रवारी 25 तारखेला लागणार होता मात्र मुलगी अल्पवयीन होती त्यामुळे कुठला अडथळा नको म्हणून विवाहसोहळा सकाळीच ठरविण्यात आला होता. दरम्यानच्या काळात दहावीच्या परीक्षा सुरू होत्या आणि मुलगी परीक्षेला गैरहजर राहिल्याने शिक्षिकेने विचारणा केल्यावर 25 मार्चला तिचे लग्न आहे असे शिक्षिकेला सांगण्यात आले.
मुलगी अल्पवयीन असताना तिचा होणारा विवाह हा बेकायदेशीर असल्याने सदर प्रकरणी ही माहिती महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती भारती गेजगे यांना समजली आणि सकाळीच पोलीस अधिकारी बर्ड्याची वाडी तिथे पोहोचले. वर्हाडी मंडळी येण्यास अवधी असल्याने पोलिसांनी तात्काळ मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले आणि अखेर मुलीच्या भावाचा विवाह लावण्यात आला तर मुलीचा विवाह दोन वर्षानंतर करू असे वचन मुलीच्या आई-वडिलांकडून प्रशासनाला देण्यात आले.