धक्कादायक..आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने घेतले विष, प्रकृती चिंताजनक

Spread the love

एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली अनेक वृत्ते प्रसिद्ध झालेली आहेत, यातून राज्यात जवळपास तीसपर्यंत आत्महत्या देखील आतापर्यंत झालेल्या आहेत. अशातच बीड जिल्ह्यातील कड्यामध्ये एसटी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बाळू महादेव कदम ( वय 35 वर्ष रा. आष्टी ) असे या चालकाचे नाव आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, बाळू कदम हे आज बस क्रमांक एम-एच 20 बीएल 2086 जामखेड-पुणे गाडी घेऊन कडा बसस्थानकात आले होते. बसस्थानक परिसरामध्ये बस पार्क करून त्यांनी विष प्राशन केले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी संबंधित चालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. कदम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

एसटी कर्मचाऱ्यांना एकतर अत्यल्प वेतन मिळते मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना ते वेतन देखील वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाला देखील बसत आहे . जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमीका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे तर दुसरीकडे खाजगी वाहतूकदार मात्र मनमानी पद्धतीने भाडे आकारत असल्याने नागरिकांचे मात्र शोषण होत आहे.


Spread the love