धक्कादायक..थोरल्याने घराबाहेर काढलं तर धाकट्याने जिवंतपणीच स्मशान दाखवलं

Spread the love

महाराष्ट्रात एक संतापजनक घटना वर्धा जिल्ह्यात समोर आली असून ज्या आईवडिलांनी आपल्याला अंगाखांद्यावर खेळवलं ते वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांना चक्क स्मशानभूमीत मुलाने नेऊन टाकलं. आई-वडिलांच्या जिवंतपणीच हा प्रकार उघडकीला आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. वयोवृद्ध असलेल्या या वडिलांना पॅरालिसीस झाल्यामुळे नीट चालता येत नाही तर आईला देखील नीट बोलता येत नाही म्हणून त्यांना मृतदेह जाळण्याच्या शेडमध्ये या मुलाने नेऊन ठेवले होते.

उपलब्ध माहितीनुसार, महादेव आलाट ( वय 85 ) असे या वृद्ध पित्याचे नाव असून त्यांची पत्नी मंजुळा आलाट या दोघांना त्यांच्या मुलाने स्मशानात नेऊन ठेवले होते. महादेव हे रेल्वे खात्यातील निवृत्त कर्मचारी असून त्यांना अनिल आणि सुनील अशी दोन मुले आहेत. थोरल्या मुलाने आई-वडिलांना घरातून बाहेर काढलं तर त्यानंतर दुसऱ्या मुलांने त्यांना स्मशानात सोडून तेथून पळ काढला. राष्ट्रीय महिला परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला त्यावेळी हे धक्कादायक वास्तव समोर आले .

मोठ्या मुलाने मारहाण करत आई-वडिलांना घराबाहेर काढले म्हणून ते लहान मुलाकडे आले होते मात्र त्याने त्यांना स्मशानभूमीत जिवंतपणीच नेऊन ठेवले. पोलिसांनी या दोन्ही मुलांना बोलावून त्यांना चांगलीच समज दिली आहे. पोलीस जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा घराला कुलूप होतं मात्र कुलूप तोडून पोलीस आत मध्ये गेले त्यावेळी आई वडिलांचे कपडेदेखील या मुलांनी जिवंतपणीच जाळून टाकलेले होते.

वडील हे रेल्वे विभागात ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते आणि त्यांना निवृत्तीनंतर पेन्शनही मिळत आहे मात्र तरीदेखील त्यांनी मुलांनी त्यांना सांभाळण्यास नकार दिल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय महिला परिषद आणि पोलीस यांनी याप्रकरणी आक्रमकतेचे धोरण अवलंबत अखेर त्यांना पुन्हा त्यांच्या घरी नेऊन सोडले आहे.


Spread the love