
एक वेगळीच घटना नागपूर जिल्ह्यात उघडकीला आलेली असून खापरखेडा परिसरातून वाहणार्या कोलार नदीच्या तीरावर एक व्यक्ती शौचाला बसली होती मात्र नदीला पूर आलेला होता आणि अशातच त्याचा तोल गेला आणि नदीत कोसळून ही व्यक्ती प्रवाहासोबत वाहत गेली त्यानंतर सुदैवाने नदीकाठच्या एका झाडाला ही व्यक्ती अडकली आणि नागरिकांनी त्याला सुखरूप बाहेर काढले.
उपलब्ध माहितीनुसार, मोरेश्वर सोनबरसे ( राहणार खापरखेडा तालुका सावनेर ) असे या व्यक्तीचे नाव असून नदीच्या काठाला ते शौचाला बसलेले होते याच दरम्यान त्यांचा तोल गेला आणि ते नदीपात्रात पडले. सध्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहापुढे ते हतबल झाले आणि प्रवाहासोबत वाहत गेले. वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांचे त्यांच्याकडे लक्ष गेले त्यावेळी ते नदीकाठच्या एका झाडाला अडकून होते. प्रशांत सोनारी, गोपाल नेवारे या कर्मचाऱ्यांनी तात्काळ साहित्याची जुळवाजुळव केली आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले. जीव धोक्यात घालून त्यांना वाचवल्याबदल कर्मचाऱ्यांचे परिसरात जोरदार कौतुक केले जात आहे.