
महाराष्ट्रात धुलिवंदनाच्या दिवशी पोलीसांवर मोठी जबाबदारी असते. अनेक वेळा उच्छाद घालणारे व्यक्ती हे मद्यप्राशन केले असल्यामुळे पोलिसांना देखील जुमानत नाहीत मात्र एकदा पोलिसी खाक्या दाखवला की बरोबर जागेवर येतात, अशीच एक घटना बीड येथे समोर आलेली असून बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका तरुणाने गोंधळ घालून पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती मात्र त्याची दारू उतरल्यानंतर तो जागेवर आला आणि पोलिसांची गयावया करू लागला मात्र पोलिसांनी त्याला दया न दाखवता बेड्या ठोकल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, धुलिवंदनाच्या दिवशी बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दुपारी साडेतीन वाजता हवलदार मिरा रेडेकर या कर्तव्य बजावत असताना तिथे अशोक उत्तमराव सोन्नर ( वय तीस राहणार शाहूनगर कॅनॉल रोड ) हा आला आणि त्याने आपली तक्रार नोंदवून घ्या असे सांगितले.
मीरा रेडेकर यांनी त्याला तक्रार काय आहे असे विचारून शांतपणे काय ते म्हणणे सांगा ? असे विचारले असता तो दारूच्या नशेत असल्याने त्याने उद्दामपणे पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्यासमोर त्याला नेले असतानादेखील त्याने त्यांच्या दालनात असभ्य वर्तन केले त्यानंतर त्याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली.
पोलिसांनी त्यांची वैद्यकीय चाचणी केली त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले मात्र काही तासांनी त्याची दारू उतरल्यानंतर तो सोडून द्या म्हणून गयावया सुरु करु लागला मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याला रात्र पोलीस कोठडीत काढावी लागली.