
नागपुर येथील एका महिलेची घरकाम करण्याच्या बहाण्याने चक्क मध्य प्रदेशात विक्री करण्यात आली मात्र तिथे गेल्यावर आरोपी दाम्पत्याने पीडित महिलेला तब्बल 16 महिने घरात डांबून ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केले. पीडित महिला गर्भवती झाल्यावर तिने एका बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म देताच आरोपींनी तिला रस्त्यावर फेकून देत पळ काढला आणि या भयावह प्रकाराला वाचा फुटली. मध्य प्रदेशातील देवास येथे ही महिला आढळून आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 महिन्यांपूर्वी पीडित महिलेची आरोपी राजपाल सिंह याला विक्री करण्यात आली होती. घरकाम देण्याच्या बहाण्याने आरोपी पीडितेला घेऊन उज्जैन येथे आला मात्र इथे आल्यावर आरोपी राजपाल आणि त्याच्या पत्नीने पीडितेला घरातच डांबून ठेवलं आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले. राजपाल याला मदत करणाऱ्या एका कृष्णपाल नावाच्या नातेवाईकासह अर्जुन नावाच्या दलालाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपासासाठी पोलीस नागपूरला देखील जाणार असल्याचे समजते .
आरोपी राजपाल आणि त्याची पत्नी चंद्रकांता यांना दोन मुलं होती पण जन्मानंतर काही दिवसांतच ती दगावली त्यामुळे त्यांनी नागपुरातील एका महिलेची खरेदी केली आणि तिच्यावर जबरदस्तीने अनेकदा अत्याचार केले त्यातून ती गर्भवती झाली आणि पीडित महिलेनं 26 ऑक्टोबर रोजी बाळाला जन्म दिला. त्यानंतर आरोपींनी 6 नोव्हेंबर रोजी तिला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून दिलं आणि या घटनेला वाचा फुटली.