
नाशिक जिल्ह्यात घडलेल्या एका मर्डर मिस्ट्रीचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आलेले असून संशयीत व्यक्तीस अटक करण्यात आलेली आहे. इगतपूरी नजीक पाडळी शिवारातील पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. सदर मृतदेह हा घोटी येथील महावीर कुबेर मोदी ( वय 53 ) या इसमाचा होता. मोदी यांचा खून त्यांच्या मुलीच्या प्रेमप्रकरणाच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे तर मोदी यांच्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवणारा गोंदेदुमाला येथील अजय संजय भोर ( वय 24 ) या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.
महावीर कुबेर मोदी ( राहणार इंदिरानगर घोटी ) यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत 15 मार्च रोजी मुंबई आग्रा महामार्गजवळील एका पुलाखाली आढळून आला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला मात्र मृतदेहाची ओळख पटल्यानंतर देखील आरोपीपर्यंत पोहोचणे सोपे काम नव्हते. ग्रामीण पोलिसांना या प्रकरणात कुठल्याही पद्धतीचे पुरावे आढळून आले नाही त्यामुळे गोपनीय चौकशीतून त्यांनी तपासाला सुरुवात केली. फिर्यादी व अन्य साक्षीदार यांच्या विश्लेषणातून गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले. अजय संजय भोर हा मजुरी काम करणारा युवक असून त्याने या खुनाची कबुली दिली आहे.
आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार, महावीर कुबेर मोदी यांची मुलगी आणि संशयित अजय भोर हे एकाच कंपनीत काम करत होते. दोघांचे एका वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि या प्रेमसंबंधाची कुणकुण महावीर मोदी यांना लागली होती. त्यांचा याला विरोध असल्याने भोर याने त्यांना दहा मार्च रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याच्या मोटारसायकलवर पाडळी शिवारातील एका पुलाजवळ नेले आणि आणि पुलाच्या कठड्यावर घेऊन जात त्यांच्या कानाच्या मागील बाजूस काचेची बाटली मारली आणि डोक्यात दगड टाकून पुलावरून खाली फेकून दिले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला दगड जप्त केला असून आरोपी अजय याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.