
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत . कोरोना काळात एसटी बंद असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे अतोनात हाल झाले.नगर जिल्ह्यात शेवगाव आगारातील एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आता नाशिक येथील कळवण आगारातील एका एसटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रमोद सूर्यवंशी असं विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव असून सूर्यवंशी यांना चक्क दोन हजार रुपयांचा तुटपुंजा पगार आणि अडीच हजार रुपये दिवाळी बोनस असे केवळ साडेचार हजार रुपये मिळाले होते. या रकमेत आजारी आई आणि बायकोचे उपचार करू की मुलांना दिवाळीसाठी कपडे घेऊ ? या नैराश्यातून हवालदिल झालेल्या प्रमोद सूर्यवंशी यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांनी त्वरित त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सोमवारी रात्री कळवनमध्ये एकाने तर मंगळवारी दुपारी इगतपुरी आगारातील दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला खाकी नावालाच आहे मात्र पगार मात्र तसे नाहीत आणि ते देखील वेळेवर मिळत नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे .