
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असतानाच अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली असून कपड्याच्या दुकानात शिरुन जावयाने सासऱ्याला चाकूने भोसकल असून सासऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. खडकी परिसरात ही घटना घडलेली असून परिसरात एकच खळबळ उडालेली आहे .
उपलब्ध माहितीनुसार, अशोक कुडले (जावई ) याचा रमेश उत्तरकर यांच्या मुलीसोबत विवाह झाला होता. गेल्या काही वर्षांपासून अशोक कुडले आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरू होता आणि या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती आणि नांदायला येत नव्हती. याचाच राग अशोक कुडले याच्या मनात होता आणि या प्रकरणी कोर्टात देखील वाद सुरु होता.
अशोक कुडले हा आपले सासरे रमेश उत्तरकर यांना भेटला आणि माझ्या पत्नीला सासरी पाठवा असे सांगत होता मात्र रमेश उत्तरकर यांनी त्याला नकार दिला आणि याच कारणावरुन बुधवारी जावई आणि सासरे यांच्यात वाद झाला त्यानंतर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जावई अशोक हा सासऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कपड्याच्या दुकानात पोहोचला.
रमेश उत्तरकर यांच्या कपड्याच्या दुकानात अशोक आला आणि वाद सुरु झाल्यावर त्याने रागाच्या भरात सासरे रमेश यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. चाकूने केलेल्या हल्ल्यात रमेश हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी अशोक याला अटक केली असून ज्यावेळी दुकानात ही घटना घडली त्यावेळी दुकानात इतरही नागरिक उपस्थित असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे मात्र दुर्दैवाने कुणीही रमेश यांच्या मदतीसाठी पुढे आलं नाही.