
पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून आता दमदाटीचे लोन चक्क पत्रकारांपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. दोन वर्षांपूर्वी दाखवलेल्या एका बातमीचा राग मनात धरून दौंड तालुक्यातील एका पत्रकारावर स्थानिक गुंडांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना दौंड तालुक्यातील पाटस इथे घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विनोद गायकवाड असे जखमी झालेल्या पत्रकाराचे नाव असून त्यांच्या भावकीतील लग्न समारंभ आटोपत ते मंडपातून बाहेर येत होते त्याचवेळी दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि कोयत्याने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आला तसेच छाती आणि दंडावर देखील मारहाणीच्या खुणा आढळून आलेल्या आहेत.
गंभीर जखमी झाल्यानंतर पत्रकार विनोद गायकवाड यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आलेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यवत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पत्र विनोद गायकवाड यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या तपासाला सुरुवात केलेली आहे.