पुणे हादरलं..रिक्षात ‘ नको तो ‘ प्रकार करण्यावरून मारहाणीत एकाचा मृत्यू

Spread the love

देशात सध्या ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून या व्यक्तींना हटकल्यानंतर चक्क हटकणाऱ्या व्यक्तीवरच हल्ले करण्यात येण्याचे प्रकार सुरू झालेले आहे. पुण्यात अशी एक घटना समोर आलेली असून दापोडी परिसरात हा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणात एका रिक्षाचालकाला आपला जीव गमवावा लागलेला असून दोन जणांना भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. डोक्यात दगड आणि सिमेंटचा गट्टू घालून आरोपींनी या रिक्षाचालकाची हत्या केलेली आहे. आलिम इस्माईल शेख ( वय 45 वर्ष ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अमित बाळासाहेब कांबळे ( वय 28 ) आणि सागर माने ( वय २५ ) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून भोसरी पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. पिंपरी चिंचवडच्या दापोडी परिसरात आरोपी अमित कांबळे हा एका रिक्षात बसून त्याच्या प्रेयसीसोबत अश्लील चाळे करत होता त्यावेळी रिक्षा चालक आलिम शेख हे तिथे आले आणि त्यांनी रिक्षात बसलेल्या जोडप्याला असे प्रकार करण्यावरून मज्जाव केला त्यानंतर त्यांच्यात वादावादी झाल्यावर आरोपी अमित याने आलिम यांना शिवीगाळ करून त्याचा मित्र सागर माने याला देखील बोलावून घेतले.

दोन्ही आरोपींनी रिक्षाचालक अलीम यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली आणि आरोपी अमित आणि सागर यांनी त्यांना मारहाण करण्यास देखील सुरुवात केली. मारहाण करताना आलिम यांच्या डोक्यात दगड आणि सिमेंटचा गट्टू घालण्यात आला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तात्काळ आरोपींना बेड्या ठोकलेल्या असून मयत रिक्षाचालक आणि आरोपी यांच्यात काही वाद होता का तसेच या प्रकरणातील प्रेयसी हिचीदेखील काय भूमिका होती याचा सध्या पोलीस तपास करत असल्याची माहिती भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेली आहे.


Spread the love