पुणे हादरलं..शेततळ्याने घेतला दोन जणांचा बळी, कुठे घडली दुर्घटना ?

Spread the love

पावसाळ्यात पाणी साठवून उन्हाळ्यात त्याचा वापर करण्यासाठी शेततळे नावाच्या संकल्पनेचा जन्म झालेला असला आणि सरकारकडून यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात असले तरी देखील सुरक्षेच्या बाबतीत शेततळी ही धोकादायक ठरण्याची आणखी एक घटना पुणे जिल्ह्यात समोर आलेली आहे. धायरी येथील खंडोबा मंदिराजवळ झालेल्या घटनेत दोन मुलांचा बुडून मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सुरज शरद सातपुते ( वय 14 ) आणि पुष्कर गणेश दातखिंडे ( वय तेरा राहणार नऱ्हे ) अशी या मुलांची नावे आहेत. पुष्कर आणि सूरज आणि त्याचा मित्र अथर्व हे तीन जण खंडोबा मळा परिसरात फिरण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना शेततळे दिसल्यानंतर सुरज आणि पुष्कर यांना पोहण्याची इच्छा झाली मात्र अथर्व याला पोहता येत नसल्याने तो शेततळ्याच्या बाहेरच थांबला होता. सुरज आणि पुष्कर यांनी शेततळ्यात उड्या घेतल्या मात्र त्यातून बाहेर त्यांना पडता आले नाही.

तळ्यात सुमारे दहा फूट खोल पाणी असल्याने त्यांना श्वास घेणे देखील अवघड होत होते आणि बाहेर पडण्यासाठी प्लास्टिक कागद मध्ये असल्याने त्यातून घसरून ते पुन्हा पाण्यात बुडत होते असे अथर्वने परिसरातील नागरिकांना सांगितलेले आहे. जवळपास कोणीही नसल्याने अथर्वने आरडाओरडा केला मात्र त्यांना मदत करणे शक्य झाले नाही आणि त्यात त्यांनी जीव गमावलेला आहे.


Spread the love