पैसे आणतेस का देऊ सोडून , बायकोला दोन तास विहिरीत लटकवलं

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना मध्यप्रदेशातील नीमच येथे समोर आलेली असून हुंड्यासाठी एका क्रूर पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिले आणि ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना खाली रस्सी फेकली आणि तिला पैशासाठी रस्सीवर लटकवून ठेवले. आरोपी पती हा त्यावेळी तिला हुंड्यासाठी मागणी करत होता आणि त्याचा व्हिडिओ देखील तो बनवत होता. पैशासाठी त्याने हा प्रकार केलेला असून त्याच्या या वर्तनावर सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार , किरखेडा गावातील राकेश किर असे आरोपी व्यक्तीचे नाव असून राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील उषा नावाच्या महिलेसोबत त्याचा विवाह झालेला होता. लग्नानंतर त्याने हुंड्यासाठी तिला त्रास देण्यास सुरुवात केली आणि दहा दिवसांपूर्वी क्रूरतेची परिसीमा ओलांडत्याने पत्नीला विहिरीत ढकलून दिले.

विहिरीत पडल्यानंतर पत्नी जीवाच्या आकांताने ओरडू लागली त्यावेळी त्याने खाली दोरी फेकली आणि तिने ती दोरी पकडल्यानंतर त्याने तिचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ ‘ पैसे द्या नाहीतर मी काहीही करू शकतो ‘ यासाठी तिच्या कुटुंबीयांना देखील पाठवला अखेर स्थानिक नागरिकांनी देखील तिथे धाव घेतली आणि उषा यांची सुटका करण्यात आली. तब्बल दोन तास त्या विहिरीत लटकत होत्या .

उषा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यानंतर पोलिसात धाव घेत आरोपीच्या काळकृत्याचा पुरावाच पोलिसांपुढे सादर केला त्यानंतर पोलिसांनी राकेश याला अटक केलेली असून तो हुंड्यासाठी तीन ते पाच लाख रुपये मागत होता असे तक्रारीत म्हटलेले आहे. 40 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला असून हा पती म्हणावा की हैवान असा संतप्त प्रश्न आता उपस्थित केला जात आहे .


Spread the love