
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना बीड इथे उघडकीस आली आहे. तरुणीचा विनयभंग झाल्याच्या अनेक बातम्या आजवर आल्या असतील मात्र या घटनेत चक्क तरुणाचा विनयभंग करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात दोन मुलींनी 30 वर्षीय तरुणाच्या घरी जात त्याचा हात धरून त्याला मिठी मारत त्याचा विनयभंग केला . तरुण तरीही ऐकत नसल्याचे पाहून त्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी दोन तरुणींसह त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील एका वसाहतीत राहत असलेल्या तरुणाच्या घरी दोन तरुणी एका मुलासोबत गेल्या . तिथे गेल्यानंतर त्यांनी वाईट हेतूने त्याचा हात धरला आणि त्याला मिठी मारून विनयभंग केला. तरुणाने त्यांना अशा प्रकाराबद्दल जाब विचारला असताना तरुणींनी त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना 11 डिसेंबर रोजी सकाळी घडली आहे. सदर घटनेनंतर भेदरलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून बबलू बाळू घाडगे, आशा बाळू घाडगे आणि वैशाली श्याम काळम सर्व राहणार लाल नगर, अंबाजोगाई यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. सदर तरुणाची आणि या तरुणींची आधी ओळख होती का ? याचा देखील पोलीस तपास करत आहेत तर दुसरीकडे तरुणाने ‘ आरोपी तरुणींना अटक करून मला न्याय द्यावा ‘ अशी मागणी केली आहे .