मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांचे फेसबुक लाईव्ह करत विषप्राशन

Spread the love

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असलेले रमेश केरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असून फेसबुक लाईव्ह करत त्यांनी विष प्राशन केलेले आहे. मुंबईत हा प्रकार घडला असून सध्या त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती त्यामध्ये पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता त्यामुळे आपली नाहक बदनामी होत आहे म्हणून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

रमेश केरे यांनी बोलताना, ‘ आपण समाजाला कधीही विकले नाही मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्तकांनी आपली बदनामी केली. बदनामी झाल्यामुळे आपण जीवन संपवत असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत मात्र सोशल मीडियात आपली कथित ऑडिओ क्लिप व्हायरल करून बदनामी केली जात आहे. माझी अशी बदनामी चंद्रकांत पाटील यांचे हस्तक विनाकारण करत आहेत. समाजाचे नुकसान होईल असे मी कधीही काम केले नाही आणि कधीही समाजाला विकलेले नाही. बदनामी करणार याची चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत. आपण गेल्यावर आपल्या बायकोला मुलाला संभाळा ‘, असे देखील आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.


Spread the love