
शासकीय कार्यालयात अनेकदा वाहनांचा तुटवडा असल्याने अधिकाऱ्यांना वेळेत गरज पडली तर खासगी वाहने भाड्याने घेतली जातात. खासगी वाहनांमध्ये सरकारी व्यक्ती असल्याने अनेक कंत्राटदार या वाहनांवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून प्रवास करतात. टोल चूकवण्यासाठी म्हणून हा प्रकार करण्यात येत असून अशा प्रकारावर आता परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. परिवहन आयुक्तांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
महामार्गावरील टोल माफी ही सरकारी वाहनांना दिली जाते म्हणून खासगी वाहनांवर देखील महाराष्ट्र शासन अशी स्टीकर लावून टोल चुकवण्यासाठी हा प्रकार खाजगी वाहतुकदार करत आहेत. अनेकदा टोलवर गेल्यानंतर खाजगी वाहनात पाठीमागे बसलेला व्यक्ति यांचे सरकारी कार्ड पाहिल्यानंतर वाहने सोडून दिली जातात मात्र आपल्या वाहनाबद्दल विचारपूसच होऊ नये म्हणून गाडीवरच ‘ महाराष्ट्र शासन ‘ असे स्टिकर लावून अनेक वाहने फिरत असतात.
महाराष्ट्र शासन ही पाटी उच्चस्तरीय शासकीय अधिकारी असलेल्या व्यक्तींच्या वाहनांना लावली जाते. एखादे वाहन अधिकारी यांच्यासाठी जर कायदेशीर सोपस्कार पार पाडून कंत्राटी पद्धतीने घेतलेले असेल तर या वाहनावर पाटी लावून लावणे नियमाला धरून असून अनेकदा या नियमांना फाटा देत गाडीवर महाराष्ट्र शासन असे लिहून गाड्या फिरवण्यात येतात त्यामुळे अनेकदा अशा प्रकारातून इतर काही गैरप्रकार होण्याची देखील शक्यता आहे म्हणून परिवहन आयुक्त यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत.