
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर इथे उघडकीस आली आहे .सदर घटनेत एका अल्पवयीन मुलीवर तिचा सावत्र बाप आणि आणखी एक जण गेल्या एका वर्षांपासून अत्याचार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारास चक्क या मुलीच्या आईची देखील सहमती होती. सावत्र बापासह अन्य एकजण आणि आई या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी 14 वर्षीय असून ती औरंगाबाद येथील एका वसतिगृहात शिक्षण घेत होती परंतु तिच्या पायाचे ऑपेरेशन झाल्याने ती शहरातील मोंढा मार्केट परिसरातील तिच्या आईकडे राहण्यासाठी आली होती. ती गेल्या वर्षभरापासून येथे वास्तव्यास होती आणि याचदरम्यान तिच्या सावत्र बापाची तिच्यावर वाईट नजर पडली आणि त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे सुरु केले एवढेच नव्हे तर शेजारी राहणारा आणखी एक जणही देखील तिचा लैंगिक छळ करत होता.
मुलीने सुरुवातीला हा प्रकार कुणाला सांगितला नाही मात्र आरोपींचे हे चाळे कमीच होत नव्हते म्हणून अखेर पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आईच्या कानी घातला त्यावेळी ‘ पप्पा आणि शेजारी जसे सांगतात तसे कर ‘ असे धक्कादायक उत्तर आईने दिले आणि पीडित मुलीला मारहाण केली. आई व सावत्र बाप आणि शेजारी राहणारा एक व्यक्ती यांनी मुलीला पकडून 24 ऑक्टोबर रोजी चक्क मुलीच्या गुप्तांगात मिरची पूड टाकून क्रौर्याची सीमा गाठली.
मुलीला असह्य वेदना होऊ लागल्यावर मुलगी शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील तिच्या मावशीकडे पळून गेली. मुलगी मावशीकडे गेल्यानंतर मावशीला देखील धमक्या सुरु झाल्या मात्र मावशीने त्यांना पिटाळून लावत थेट वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सावत्र बापासह आई व अन्य एकजण अशा तिघांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे .