महिला कॉन्स्टेबलने राहत्या घरी घेतला गळफास : काय आहे कारण ?

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात समोर आलेली असून घरगुती वादातून एका महिला कॉन्स्टेबलने गळफास घेत आत्महत्या केली आहे. योगिनी सुकुमार पोवार (36) असे आत्महत्या करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचे नाव असून कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली आहे .

योगिनी सुकुमार पोवार यांनी आत्महत्येपूर्वी महिलेने सुसाईड नोट लिहिली असून मूळ होत नसल्याच्या कारणावरून पती शारिरीक आणि मानसिक त्रास देत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी ती सुसाईड नोट ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरु केली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात पतीसह सासूवर गुन्हा दाखल झाला असून पती विकास ऊर्फ विकी काशीनाथ कांबळे (वय २८) सासू सविता (वय ५५, दोघेभाटणवाडी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, योगिनी यांचे मूळ गाव पिंपळगाव खुर्द (ता. कागल) आहे. त्या २०१४ मध्ये पोलिस दलात भरती झाल्या. सहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून पती विकास खासगी नोकरी करतो.सकाळपासून माहेरची मंडळी योगिनी यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती मात्र संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या वडिलांना काळजी वाटू लागली आणि ते मित्राच्या मोटारसायकलवरून आज पोलिस लाईन येथे मुलीच्या घरी गेले मात्र घराला आतून कडी होती. खिडकीतून आत डोकावून पाहिले त्यावेळी योगिनी यांनी तुळीला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले.

योगिनी यांचे वडील सुकुमार पोवार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात मुलीला संशयित पती विकास आणि सासू सविता हे दोघे २०१७ पासून चारित्र्याच्या संशयावरून व मूल होत नसल्याने वारंवार शारीरिक, मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळूनच तिने राहत्या घरी आत्महत्या केली. असे म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा संशयितांना रात्री अटक करण्यात आली आहे .

मयत योगिनी पोवार या कोल्हापूर पोलिस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या. योगिनी यांना त्यांच्या पतीकडून नेहमी शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता.महिला कॉन्स्टेबलच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शाहुपूरीचे राजेश गवळी यांनी लागलीच घटनास्थळाची पाहणी केली.


Spread the love