शिवसेनेच्या माजी आमदाराच्या घरात घुसून म्हणाला ‘ मी आयबीचा माणूस ‘

Spread the love

सामान्य माणसाला गुन्हेगारांनी फसवणे ही काही नवीन बाब राहिलेली नाही मात्र चक्क शिवसेनेच्या माजी आमदाराला घरात घुसून फसवण्याची एक घटना अकोला जिल्ह्यात समोर आलेली आहे. शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या घरात प्रवेश मिळवत एका व्यक्तीने आपण आयबीचा अधिकारी आहोत असे सांगितले आणि त्यांच्या वाहनांची आणि घराच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली. अवघ्या काही मिनिटात तो तोतया असल्याचे सिद्ध झाले आणि त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

अकोल्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गनजीक माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा बंगला आहे. या बंगल्यात गुरुवारी एक कार पहिल्या माळ्यावरील पार्किंगमध्ये आले आणि त्यामधून एक व्यक्ती उतरला आणि समोरील बाकावर जाऊन बसला त्यावेळी यश अश्विनकुमार बाजोरिया यांना त्या व्यक्तीचा संशय आला आणि यश आणि त्यांचे काका संजय बाजोरिया व सुनील बाजोरिया हे त्याच्याजवळ गेले त्यानंतर त्याने आपण आयबीचा माणूस आहे असे सांगून सगळ्या गाड्यांची कागदपत्रे तसेच चाव्या मागितल्या आणि तिथे उपस्थित असलेले माजी आमदार बाजोरिया यांच्या नातवासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

समोरील व्यक्तीचे बोलणे आणि त्याचे वागणे पाहून घरातील मंडळींचा संशय बळावला आणि त्यांनी त्याला ओळखपत्राची मागणी केली मात्र त्याने आपल्याकडे ओळखपत्र नसल्याचे सांगत त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली त्यामुळे त्याला बंगल्याबाहेर काढून पोलिसांना बोलावण्यात आले आणि त्याचे पितळ उघडे पडले. पोलिसांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर आरोपी प्रतीक संजय कुमार गावंडे ( वय 32 ) याच्याविरुद्ध भा द वि कलम 452, 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


Spread the love