
राज्यात शेतांसाठी पाण्याची अडचण काही प्रमाणात कमी व्हावी म्हणून सरकारकडून शेततळ्यांना अनुदान दिले गेले आणि खेडोपाडी शेततळी उभी राहिली मात्र शेततळ्याच्या सुरक्षेसाठी कुठल्याच पद्धतीच्या उपाययोजना करण्याकडे शेतकरी देखील पाठ फिरवत असून सरकार दरबारीदेखील याबाबत उदासीनता आहे.
आत्तापर्यंत शेततळ्यात बुडून अनेक बळी गेलेले असून देखील या प्रकरणावर काहीही उपाययोजना होत असल्याचे दिसून येत नाही अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात समोर आलेली असून खेळत खेळत शेततळ्यात पडून तीन चिमुरड्यांनी आपला जीव गमावलेला आहे. नऊ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास शेटफळ येथे ही घटना घडली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विनायक भरत निकम ( वय बारा ) , सिद्धेश्वर भरत निकम ( वय 6 ) , कार्तिक मुकेश हिंगमिरे ( वय पाच ) अशी मरण पावलेल्या चिमुरड्यांची नावे आहे. भरत निकम हे शेतमजुरी करत असून शेटफळ येथील त्यांचे मेहुणे मुकेश हिंगमिरे यांच्याकडे आले होते.
मागील काही महिन्यांपासून शेटफळ येथील महेश तानाजी डोंगरे यांच्या शेतात पत्नी रेश्मा आणि भरत हे काम करत होते. नऊ मे रोजी दोघे सकाळी मजुरीसाठी शेतात गेले त्यानंतर विनायक, सिद्धेश्वर आणि मामाचा मुलगा कार्तिक हे खेळत खेळत दुपारी तीन वाजता संतोष जनार्दन डोंगरे यांच्या शेततळ्याकडे पोहायला गेले आणि पाय घसरून बुडून मरण पावले. कार्तिकचे वडील मुकेश हिंगमिरे यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.