
देशात फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असूनही नागरिक देखील सजग नसल्याचे चित्र आहे अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यात पंचवटी येथे उघडकीला आली असून ओळखीचा फायदा घेत पैसे तिप्पट करून देतो, असे करत सात लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एका महिलेसह तिच्या साथीदाराला देखील पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी हे औरंगाबाद जिल्ह्यातील असून अजोदिन फिदाअली सर्फी असे त्यांचे नाव आहे. अजोदिन यांनी परिसरात राहणाऱ्या महिलेसह शिवाजी शिंदे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अजोदिन यांची तोंड ओळख असलेल्या एका संशयित महिलेने आपल्याकडे पैसे तिप्पट करून देणारी पार्टी आहे, तुम्ही नाशिकला पैसे घेऊन या असे सांगितले होते. अजोदिन हे आपल्याकडील सात लाख रुपये महिलेकडे देण्याच्या उद्देशाने नाशिक येथे आले. सात लाखाचे तेवीस लाख रुपये होतील व एक लाख रुपये मात्र मला कमिशन द्यावे लागेल, असे देखील या महिलेने सांगितले होते.
नाशिक येथे आल्यानंतर त्यांना एका संशयिताने पैसे दाखवण्यास सांगितले आणि झटपट पैसे घेऊन संशयित गाडीत बसून पळून गेले. पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचवटी पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी देखील अवघ्या चोवीस तासात संशयित महिला आणि तिच्या समवेत असलेल्या शिवाजी शिंदे नावाच्या एका संशयिताला अटक केली आहे तर इतर आरोपी फरार असल्याचे समजते.