
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सोलापूर इथे चक्क पोलीस अधीक्षक आणि न्यायाधीशांच्या नावे फेक अकाऊंट काढून पैशाची मागणी करणाऱ्या दोन जणांना राजस्थान आणि उत्तरप्रदेश राज्यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चक्क पोलीस अधीक्षक आणि न्यायाधीशांच्या नावे यांनी फेसबुकवर फेक अकाऊंट सुरु केले होते आणि त्याद्वारे त्यांनी पैशाची मागणी सुरु केली होती.
उपलब्ध माहितीनुसार, जानेवारी महिन्यात एका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले आणि त्यानंतर या भामट्याने न्यायाधीशांचे मित्र, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ज्यांना रिक्वेस्ट पाठवली त्यांना या प्रकारचा अंदाज आला नाही आणि त्यांनी रिक्वेस्ट मान्य केली. त्यानंतर आरोपीनी पैशाची गरज असल्याने सांगून त्यांना गुगल पे आणि फोन पे चे नंबर देत १० हजार आणि ७ हजार रुपये देखील उकळले मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सोलापूर जिल्ह्यातील माढा पोलीस ठाणे इथे गुन्हा नोंदवण्यात आला.
त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पुन्हा असाच प्रकार सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासोबत देखील घडला.तेजस्वी सातपुते यांच्या खऱ्या अकाउंटवरील माहितीचा वापर करून तसेच दिसणारे बनावट अकाउंट भामट्यानी तयार केले आणि तेजस्वी सातपुते यांचे मित्र, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवून पैशाची मागणी सुरु केली.
पोलिसांनी अज्ञात इसमाविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आणि या दोन्ही गुन्ह्याचा तपास सायबर सेलचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे यांच्याकडे देण्यात आला. आरोपी हे राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथे असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती आणि त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिसांची दोन तपास पथके तयार करून उत्तरप्रदेश आणि राजस्थान या ठिकाणी पथके रवाना केली आणि आरोपीना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असताना न्यायालयाने त्यांना 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.