
पोलीस दलातील भ्रष्टाचार आता काही लपून राहिलेला नाही. महसूल आणि पोलिस या दोन खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत असून अशीच एक अनोखी घटना समोर आलेली आहे. जुगार खेळण्याचा बनावट गुन्हा एका होमगार्डवर दाखल करत त्याची मोटर सायकल आणि मोबाइल जप्त करण्यात आला आणि तो परत देण्यासाठी न्यायालयाला अनुकूल निवेदन देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सिल्वासा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस एम पटेल यांना सीबीआयने अटक केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ट्राफिक पोलीस विभागात किरण खंदारे नावाचा एक व्यक्ती होमगार्ड म्हणून काम करत होता. पोलिस निरीक्षक रमेश गावित हे मुख्य अधिकारी असताना ट्राफिक विभागाचे पावती पुस्तक गहाळ झाल्याची तक्रार सिल्वासा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती मात्र हे पावती पुस्तक गहाळ झालेले नाही असा दावा करत होमगार्ड खंदारे यांनी गावित यांना वारंवार विचारणा केलेली होती त्यामुळे गावित यांनी खंदारे यांची बदली करण्याचा प्रयत्न करण्यात आला असे खंदारे यांचे म्हणणे होते. त्यानंतर खंदारे यांच्यावर जुगार खेळत असल्याची केस टाकण्यात आली आणि त्यानंतर त्यांची मोटरसायकल आणि मोबाइल सिल्वासा पोलिसांनी जप्त केलेला होता.
सदर प्रकरणाचा तपास सिल्वासा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एस एम पटेल हे करत होते. खंदारे यास मोटारसायकल आणि मोबाईल परत मिळावी म्हणून न्यायालयात काय ते होईल मात्र त्यासाठी न्यायालयाला अनुकूल असा अहवाल आम्हाला सादर करावा लागेल असे सांगत खंदारे यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. खंदारे यांनी पाचऐवजी चार हजार रुपये देईल असे सांगितल्यानंतर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार देण्यात आली त्यानुसार खंदारे आणि पटेल यांच्यातील मोबाईल रेकॉर्डिंग देखील चेक करण्यात आले आणि पोलीस इन्स्पेक्टर एस एम पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली.