सोशल मीडियामुळे अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत असून अशीच एक घटना उत्तर प्रदेश इथे उघडकीस आली आहे . घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील असून इथे चक्क पाणीपुरी खाल्ली म्हणून मुख्याध्यापक संतापले आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याला अमानुष अशी शिक्षा दिली. त्यांनी मुलाला इमारतीच्या वरच्या मजल्यावर गॅलरीतून खाली उलटं लटकवलं. इयत्ता दुसरीमध्ये हा विद्यार्थी शिकतो. व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर पालकांमधून संताप व्यक्त झाल्यावर मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अहरौरमधील बुढादेई इथल्या सोनू यादव हा विद्यार्थी खासगी शाळेत शिकतो. तो गुरुवारी दुपारच्या वेळेत शाळेतून बाहेर जाऊन पाणीपुरी खायला गेला. याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना मिळाली. मुख्याध्यापकांनी सोनूला बोलावून दुसऱ्या मजल्यावर नेले आणि दुसऱ्या मजल्यावर गॅलरीतून मुख्याध्यापकांनी सोनूच्या पायाला पकडून उलटे लटकवले. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ कोणीतरी शूट केला आणि व्हायरल केला.
बीएसए गौतम प्रसाद यांनी एबीएसए जमलापूर यांना चौकशीचे आदेश दिले असून मुलाचा जबाब घेऊन मुख्याध्यापकांवर कारवाई करा, असेही सांगितलं आहे. मुख्याध्यापकांवर कारवाई झाल्याशिवाय मुलाला शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका मुलाच्या वडिलांनी घेतली आहे सोबतच सोनूच्या वडिलांनी असा आरोप केला की, याआधीदेखील सोनूला विनाकारण शाळेत मारहाण झाली होती.