संध्याकाळी सात वाजले तरी मुले घरी आली नाही, वाळूमाफियांच्या ‘ त्या ‘ प्रकाराने ग्रामस्थ संतापले

Spread the love

वाळू माफियांची दादागिरी हा काही नवीन विषय राहिलेला नाही. कायदा हातात घेऊन वाळूमाफिया सरकारी यंत्रणेला आव्हान देत आहे तर दुसरीकडे ग्रामीण पातळीवर देखील या वाळू माफियांच्या कारणांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अशीच एक घटना बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील शहाजनपुर चकला येथे घडलेली असून बेसुमार पद्धतीने केलेल्या वाळू उपशामुळे नदीच्या पात्रात निर्माण झालेल्या खड्ड्यात पडून चार मुलांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता घडली आहे.

शहाजहानपूर व तांदळवाडी ही गावे एकमेकांना चिटकून असल्याने दोन्ही गावाचे नागरिक हे नदीपात्रातून ये-जा करत असतात. 6 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता गणेश बाबु इंकर ( वय आठ ), आकाश राम सोनवणे ( वय 10 ) बबलू गुणाजी वक्ते ( वय 11) व अमोल संजय कोळेकर हे चौघे स्थानिक मुले नदीपात्रात आले होते. काठावर बूट आणि चपला सोडून ते अमोल कोळेकर याला तांदळवाडीला सोडण्यासाठी नदीपात्र ओलांडत होते. दरम्यान नदीपात्रातील खोल खड्डे याचा अंदाज न आल्याने एकापाठोपाठ एक असे चौघेही जण पाण्यात बुडाले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

संध्याकाळी सात वाजले तरी मुले घरी परत न आल्याने कुटुंबियांनी एकमेकाकडे विचारत विचारपूस सुरु केली त्यावेळी काही जणांनी मुले नदीपात्राकडे गेली असल्याची माहिती दिली. नदीच्या काठावर चपला आणि बूट आढळल्याने शंकेची पाल चुकचुकली मात्र त्याच वेळी नदीपात्राच्या खड्ड्यात चार जणांचे निरागस अशा स्वरुपात मृतदेह पडलेले पाहून कुटुंबीयांनी तिथेच टाहो फोडला.

सदर घटनेला अवैध वाळू उपसा हा जबाबदार असून नागरिकांनी संताप व्यक्त करत या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे म्हटले होते त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


Spread the love