सरकारी नोकरी म्हटलं की अनेक लोक पैसे देण्यासाठी तयार होतात आणि याचाच गैरफायदा घेत सरकारी नोकरीचे आमिष दाखवत काही टोळ्या देखील कार्यरत झालेल्या आहेत . असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात उघडकीस आला असून सदर प्रकरणी सातवी शिकलेल्या अन दहावी शिकलेल्या दोन व्यक्तींनी उच्चशिक्षित तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली.
उपलब्ध माहितीनुसार, मारुती जयवंत साळुंखे ( वय 42 राहणार नरोटेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मूळ राहणार सांगली जिल्हा ) आणि प्रवीण राजाराम येवले ( वय 34 राहणार येवलेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा ) अशी आरोपींची नावे आहेत. मारुती हा सातवी तर प्रवीण येवले हा दहावी शिकलेला आहे सातारा एमआयडीसीमध्ये नोकरी करत असताना घर खर्च भागवताना त्यांना आर्थिक अडचणी येत असल्याने काहीतरी वेगळं करायचं या नादाने त्यांनी आपण सरकारी नोकर आहोत असं सांगून पैसे देऊ उकळवायला सुरुवात केली.
फसवणुकीची सुरुवात कुठून करायची याचा विचार केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या गावातीलच पदवीधर तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले. दोघांचेही राहणीमान साधे होते मात्र प्रभावी पटवून देण्याची पद्धत अत्यंत प्रभावी असल्याकारणाने उच्चशिक्षित तरुणांना देखील त्याची भुरळ पडली आणि त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते कोल्हापूर तहसील कार्यालयापर्यंत मोठमोठ्या लोकांसोबत आपली ऊठबस आहे असं सांगत कोणाला शिपाई तर कोणाला तहसीलदार यांचा चालक बनवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सरकारी नोकरी म्हटल्यानंतर उच्चशिक्षित तरुणांनी देखील त्यांच्यावर झटकन विश्वास टाकला आणि गेल्या तीन वर्षांपासून त्यांची फसवणूक केली. विशेष म्हणजे पीडित तरुणांना भेटताना त्यातील फक्त एकजण भेटायचा आणि दुसऱ्याला फोन लावायचा. समोरील व्यक्ती फोनवर उच्च पदावर असल्याचे भासवायचा यामुळे पीडित तरुणांना देखील हळूहळू हेच आपले उज्वल भवितव्य घडू शकतात असा भास झाला आणि त्यांनी आत्तापर्यंत एक-दोन नव्हे तर तब्बल 18 तरुणांकडून पंधरा लाखांपर्यंत पैसे उकळले.
फसवणूक झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश विद्यार्थी पदवीधर असून त्यांनी दिलेली ही रक्कम या दोन्ही आरोपींनी मौजमजा आणि मस्ती करणे यात खर्च केली आहे. त्यांच्याकडून ही रक्कम कशी वसूल करायची असा प्रश्न आता पोलिसांना पडला असून समोरील व्यक्तीच्या सांगण्यावर भरवसा ठेवून नोकरीच्या आमिषाने उच्च शिक्षित लोकांना देखील गंडा घातला जाऊ शकतो हे या प्रकरणानंतर समोर आले आहे.