महाराष्ट्रात पोलीस दलातील भ्रष्टाचार काही कमी होण्याचे नाव घेत नाही. अशीच एक घटना नवी मुंबई येथे समोर आली असून विनयभंगाच्या गुन्ह्यात एका व्यक्तीवर दाखल झालेल्या प्रकारात शिक्षा होऊ नये यासाठी लाच मागणार्या एका पोलिस उपनिरीक्षकावर लाचलुचपत विभागाने कारवाई करत त्याला रंगेहाथ पकडले आहे.
नवी मुंबई परिसरात मच्छी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीवर त्याच्या राहत्या परिसरातील एका तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या या गुन्ह्यात शिक्षा होऊ नये यासाठी पोलिस उपनिरीक्षक सागर पवार यांनी या व्यक्तीकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. सदर रकमेसाठी त्यांनी या व्यक्तीकडे तगादा देखील सुरू केला त्यामुळे संबंधित व्यक्तीने अखेर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
उपअधीक्षक ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विद्युलता चव्हाण यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी सापळा रचला होता त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्याकडून तडजोड करून 10000 रुपये घेण्याचे मान्य केल्याचे समोर आले आणि सापळा रचून त्यानंतर मंगळवारी लाच घेतली जात असताना पवार यांना पकडण्यात आले.