आतापर्यंत आपण घरफोडी, वाहनचोरी आणि फार तर पेट शॉप मधून पक्षी चोरीला गेल्याच्या बातम्या ऐकत असतो मात्र महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील परळी इथे चक्क 124 गाढवांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. गाढवांविषयी गेल्या काही दिवसांपासून अनेक गैरसमज पसरलेले असून त्या गैरसमजामधून गाढवे मिळेनाशी झालेली आहे , त्यामुळेच हा प्रकार घडला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. चोरी झालेल्या गाढवांची किंमत तब्बल 20 लाखांच्या घरात असल्याचे समजते.
परळीमध्ये गाढव चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून तब्बल 34 गाढवांच्या मालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दिली आहे. गाढव हेच आमच्या उदरनिर्वाहाचं साधन असल्या कारणाने याचा त्वरित तपास लावून आम्हास न्याय द्यावा, अशी मागणी या गाढवाच्या मालकांच्या वतीने करण्यात आली आहे. तक्रारदार अमोल मोरे आणि त्यांच्या सोबतच्या 34 जणांच्या स्वाक्षऱ्या असून आता पोलिसांवर ही गाढवे शोधून देण्याची जबाबदारी आली आहे .
25 ते 27 ऑक्टोबर दरम्यान रात्रीच्या सुमारास तब्बल 124 गाढवं चोरीस गेली आहेत. मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि नाथ चित्र मंदिर परिसरातून या चोऱ्या झालेल्या आहेत. प्रत्येक गाढवाची सरासरी किंमत ही 15 हजार सांगण्यात येत असून सर्वांची अंदाजे एकूण किंमत 20 लाखांच्या घरात आहे. तपास सुरू आहे असं परळी शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी सांगितल आहे .