महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली असून सातारा जिल्ह्यात एका युवतीला गाडी आडवी लावून धमकावण्यात आले आणि ‘ आत्ताच्या आता तू माझा मोबाईल नंबर ब्लॉक काढ नाहीतर तुला आणि तुझ्या बहिणीला काय करेल ते समजणार देखील नाही ‘, अशी धमकी एका व्यक्तीने दिली त्यानंतर पीडित 19 वर्षीय युवतीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आणि या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
उपलब्ध माहितीनुसार, ओमकार मांडवे ( वय 23 राहणार शाहूपुरी सातारा ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित युवती ही पंचवीस तारखेला रात्री नऊ वाजता पायी जात असताना ओंकार मांडवे याने गाडी आडवी लावून तिला थांबवले आणि तू माझा नंबर ब्लॉक काढ नाहीतर तुला आणि तुझ्या बहिणीला काय करेन हे समजणार देखील नाही अशी धमकी दिली.
घाबरलेली युवती आधी घरी गेली आणि तिने हा प्रकार आपल्या पालकांच्या कानी घातला त्यानंतर पीडित युवतीसह घरच्या व्यक्तींनी पोलीस स्टेशन गाठले आणि या युवकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल असून सदर प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.