सैन्यात नोकरी करण्याचे अनेक युवकांचे स्वप्न असते मात्र त्यांच्या स्वप्नासोबत खेळणाऱ्या अनेक अपप्रवृत्ती समाजात आहेत . अशीच एक घटना सातारा जिल्ह्यात उघडकीला आली असून सैन्यदलातील अधिकारी असल्याचे भासवत भरती करण्यासाठी नऊ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या आणि सैन्य दलाने पकडलेले आहे. त्याच्यावर वडूज पोलिस ठाण्यात दोन तर दहिवडी पोलीस ठाण्यात एक असे एकूण 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
प्रवीण शिवाजी मरगजे ( राहणार कानवडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून कानवडी येथील एक व्यक्ती सैन्यदलाचा गणवेश आणि बनावट ओळखपत्र वापरून परिसरातील युवकांना सैन्यदलात भरती होण्यासाठी पैसे मागत असल्याची एक बातमी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना याबाबत कारवाईचे निर्देश दिले.
किशोर धुमाळ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले आणि त्या पथकाने कानडी परिसरात सदर व्यक्तीची संपूर्ण माहिती हस्तगत केली आणि त्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. चौकशीमध्ये त्याने मान आणि खटाव तालुक्यात अनेक युवक आणि पालकांची फसवणूक केल्याची माहिती मिळालेली असून त्याच्याविरोधात सचिन सुभाष खरात (राहणार सिंधी बुद्रुक तालुका मान ) तर मनिषा मनोज निकाळजे ( राहणार तालुका खटाव ) व आप्पासाहेब भिकू जानकर यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. न्यायालयाने त्याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.