पोलिसांनी संशयावरून ‘ तान्हाबाई ‘ ची झडती घेतली आणि ..

Spread the love

महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असतानाच याच दरम्यान भुरट्या चोर्‍यादेखील वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे उघडकीला आली असून लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांच्या डब्यात शिरायचे आणि त्यांची पर्स गायब करायची अशा पद्धतीने चोऱ्या करणारी तानाबाई पवार ( वय 42 राहणार मुंबई ) या महिलेला अटक करण्यात आलेली आहे. रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली असून तिने आत्तापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

दुर्गा ब्राह्मणे ( वय 35 राहणार रायगड ) या गुरुवारी दुपारी लोकलमधून प्रवास करत असताना कल्याण रेल्वे स्थानक येथे लोकल आल्यावर त्यांच्या पर्समधील एक छोटी पर्स गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यात रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. दुर्गा यांनी फलाटावरील महिला पोलिसाला ही बाब सांगितली आणि महिला पोलिसाने लोकल ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली याच दरम्यान डब्यात एक संशयित महिला दिसून आली म्हणून महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची झाडाझडती घेतली असता तिच्याकडे दुर्गा यांची पर्स आढळली.

तानाबाई पवार ही सराईत गुन्हेगार असून लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेत तिने याआधी देखील अनेक पराक्रम केले आहेत. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिने किती चोऱ्या केल्या आहेत याचा देखील तपास सुरू असून सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे.


Spread the love