गेल्या काही वर्षांपासून फसवणुकीसाठी कोण काय करेल याचा नेम राहिलेला नाही अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत. अशीच एक घटना महाराष्ट्रात समोर आलेली असून विठू माऊली गृह उद्योग या संस्थेने मेणबत्ती उद्योगाच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी मदत करावी अशी गेले अडीच वर्ष महिला मागणी करत होत्या अखेर बुधवारी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात विठू माऊलीचा मास्टरमाइंड असलेला अशोक उर्फ राजन भिसे आणि एजंट अभिजीत डोंगरे यांच्यासह एकूण सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे असणाऱ्या विठू माऊली या संस्थेने बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण तालुक्यातील शेकडो महिलांची फसवणूक केलेली आहे. महिलांच्या म्हणण्याप्रमाणे संस्थेचा प्रमुख राजन भिसे हा आणि त्याचा एजंट अभिजीत डोंगरे यांनी महिलांना ‘ कच्चामाल देतो तुम्ही मेणबत्त्या बनवून द्या ‘ असे आमिष दाखवत मेणबत्त्या बनवण्यासाठी लागणारा साचा, प्रशिक्षण, कच्चामाल सर्वकाही आम्ही देऊ असे सांगत त्यांनी प्रत्येकी एका महिलेकडून दहा ते चौदा हजार रुपये घेतले. ज्यांच्याकडे रोख रक्कम नव्हती त्यांना त्यांनी मल्टी स्टेट बँकेचे 20 हजार रुपयांचे कर्ज मिळवून दिले आणि सुरुवातीला त्यांनी काहीजणांचा माळ उचलला मात्र त्यानंतर ते गायब झाले.
महिलांच्या तक्रारी झाल्या मात्र कागदोपत्री पुरावे नसल्याने अडीच वर्ष कुठलीच दखल घेण्यात आली नाही त्यानंतर वैशाली अरुण जगताप ( राहणार निंबुत तालुका बारामती ) यांनी या प्रकरणी चिकाटीने पाठपुरावा पाठपुरावा सुरू केला आणि पुरावे जमा करत पोलिसांना दखल घ्यायला भाग पाडले त्यामुळे अशोक भिसे, सविता अशोक भिसे, गजराबाई मानसिंग भिसे, मंगल लकडे, सोनाली रमेश सागर आणि अभिजीत डोंगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.