पुणे परिसरातील चिखली येथे रविवारी (दि.17) आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनी 48 तासांत याप्रकरणाचा छडा लावत मंगळवारी दि.19) एका आरोपीला अटक केली असून खंडणीसाठी मुलाचे अपहरण केले व त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची माहिती उघडकीस आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, लक्ष्मण बाबुराम देवासी (वय 8, रा. हरगुडे वस्ती, चिखली मुळगाव राजस्थान) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून बपील अहमद रईस लष्कर (वय 26, रा. हरगुडेवस्ती, कुदळवाडी, चिखली मुळगाव आसाम) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील 83 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासणी करुन तांत्रिक विश्लेषण करत संशयीत आरोपीला ताब्यात घेतले होते त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आठ वर्षीय मुलाच्या आई वडिलांकडून एक लाख रुपये खंडणी मागण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करुन त्याला पत्र्याच्या शेडमध्ये नेले होते .
शेडमध्ये नेल्यावर मुलगा आरडाओरडा करु लागल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केला. आठ वर्षीय मुलाचा खून कोणत्या कारणातून झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती मात्र पोलिसांनी विक्रमी वेळेत खंडणीच्या मागणीसाठी खून केला असल्याचे उघडकीस आणले असून या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.