नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नगर शहरातील सावेडी परिसरातील भिंगारदिवे मळा येथे राहणारा नाना लक्ष्मण शिंदे ( वय 35 ) याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी तब्बल दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. विशेष सरकारी वकील एडवोकेट मनीषा केळगंद्रे शिंदे यांनी या प्रकरणी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला होता त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय दिलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नगर शहरातील एका उपनगरात राहणारी अल्पवयीन मुलगी शिवण क्लासला जाते म्हणून गेल्यानंतर पुन्हा आली नाही. मुलीच्या घरच्यांनी तिचा मैत्रिणींकडे आणि नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तरीही ती आढळून आली नाही. फिर्यादी यांनी त्यांची पुतणी हिच्याकडे विचारपूस केल्यावर अल्पवयीन मुलगी हिला नाना लक्ष्मण शिंदे हा त्याचा मित्र असलेला प्रवीण भावड्या वाकळे याच्या मदतीने घेऊन गेलेला समजले त्यानंतर सदर प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रवीण वाकळे याने तपासात सदर मुलीला आणि नाना शिंदे यांना पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथे सोडले अशी माहिती दिल्यानंतर पोलीस पथकाने तिथे धाव घेत पीडित मुलीला आणि नाना शिंदे यास तोफखाना पोलीस ठाण्यात आणले होते. मुलीने सांगितल्याप्रमाणे नाना शिंदे याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते आणि त्यानंतर तिला एक मोबाईल देखील घेऊन दिला होता त्यानंतर ते सातत्याने एकमेकाच्या संपर्कात होते.
नाना शिंदे याने 12 मार्च 2018 रोजी फिरायला जाण्याच्या बहाण्याने तिला गाडीत बसवले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी नाना शिंदे याच्या विरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर एन पिंगळे यांच्यासह पोलिस अंमलदार जी ए केदार यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. सरकारी पक्षातर्फे 13 साक्षीदार तपासण्यात आले आणि आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.