‘ मनावर दगड ठेवून ‘ प्रकरणात भाजपची सपशेल माघार , घेतला ‘ तो ‘ निर्णय

‘ मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले ‘ या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर बंडखोर आमदारांसह राज्यात देखील चांगलीच खळबळ उडाली त्यानंतर भाजपने अखेर सावधगिरीची भूमिका घेत चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य समाज माध्यमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.

भाजपाची पनवेल येथे कार्यकारिणी बैठक झाली होती त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘ केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झाले पण ते पचवून आपण पुढे गेलो कारण आपल्याला गाडा हाकायचा होता. ‘

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडिया देखील जोरदार चर्चा रंगू लागली. भाजपच्या त्यागाची हवा निघून गेली का ? असा देखील प्रश्न भाजपला नेटीझन्स विचारू लागले त्यानंतर भाजप भांबावून गेली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य समाजमाध्यमावरून काढून टाकण्यात आले. व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर टाकण्यात आला मात्र तोपर्यंत चंद्रकांत पाटील यांच्या तोंडातून प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांची खदखद बाहेर आली का ? या चर्चेने देखील जोर पकडला.

सदर कार्यकारिणी बैठकीत भाजपचे काही नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील पोचलेले होते. त्यांनादेखील चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात संबोधीत करताना , ‘ जेव्हापासून शपथ घेतली तेव्हापासून सगळे मुंबईत आहेत मात्र आता आपल्या घरी जा आणि कामाला लागा. जेव्हा सगळे ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावले जाईल , ‘ असे सांगितलेले असल्याने राज्यात अजून आठवडाभर तरी फक्त दोन जणांची सरकारच पाहायला मिळणार आहे असे दिसून येत आहे.