काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात कारागृहातील कैद्यांना गांजा पोहोचवण्यासाठी चक्क रबरी बॉलचा वापर करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते त्यानंतर अशाच स्वरूपाची दुसरी घटना कोल्हापूर येथे उघडकीला आलेली असून कळंबा कारागृहात चक्क स्पीड पोस्टच्या पाकीटामधून गायछाप पुडीमध्ये गांजा लपवून पाठवण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. सदर प्रकार उघडकीस आल्यावर जुना राजवाडा पोलिसांनी श्रीकांत दिलीप भोसले ( राहणार फुलेवाडी कोल्हापूर ) या संशयित व्यक्तीवर गुन्हा दाखल दाखल केलेला आहे.
कळंबा कारागृह इथे कैद्यांना आलेली पत्रे ही तपासून त्यानंतर कैद्यांना दिली जातात. सध्या शिक्षा भोगत असलेले कैदी महेश सुरेश पाटील यांच्याकडे हे पत्र तपासण्याचे काम दिलेले आहे त्यावेळी सोमवारी सकाळी कारागृहात सुरज दिलीप भोसले या नावाने एक पाकीट आले होते. कारागृहात या नावाचा कुठलाच कैदी नसताना हा प्रकार कसा घडला याचा शोध सुरू झाला.
पोलीस तपासाला सुरुवात झाल्यावर या नावाने श्रीकांत भोसले नावाच्या व्यक्तीने स्पीड पोस्टच्या पाकीटामधून तीन ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ कारागृहात पाठवलेला होता. सदर घटनेनंतर कारागृहात एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर तुरुंग अधिकारी निशा श्रेयस्कर यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली असून तपास सुरू आहे.