सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी होऊ शकतो अखेर हा ‘ मोठा ‘ निर्णय

देशात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून अनेक आवाहने करून आणि लोकजागृतीपर उपक्रम राबवून देखील नागरिक सायबर गुन्हेगारांच्या फसवेगिरीला बळी पडत आहे. आरबीआयकडून याप्रकरणी अखेर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून फ्रॉड रजिस्ट्री अर्थात फसवणूक नोंदणी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक फसव्या वेबसाईटचे फोननंबर तसेच मोबाईल नंबर एसएमएसआयडी यांचा विविध पद्धतीचा डेटाबेस तयार केला जाणार आहे. आरबीआयचे कार्यकारी संचालक अनिल कुमार शर्मा यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे.

शर्मा म्हणाले की, फसवणूक रजिस्ट्री स्थापन करण्याचा विचार आरबीआय करत आहे. सदर वेबसाईट आणि फोननंबर, मोबाईल नंबर हे ब्लॉक केल्यानंतर फसवणूक करणारे याच माध्यमांचा वापर करून पुन्हा फसवणूक करू शकणार नाहीत. फसवणूक रजिस्ट्री स्थापन करण्यासाठी कुठलीही कालमर्यादा अद्यापपर्यंत ठरवलेली नाही मात्र विविध संस्थांशी आमची चर्चा सुरू आहे. पेमेंट सिस्टीम मध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना डेटाबेसमध्ये प्रवेश दिला जाईल तसेच ग्राहकांना नवीन धोक्याची माहिती देण्यासाठी फसवणूक डाटा प्रकाशित केला जाईल असेही ते पुढे म्हणाले .