पुन्हा एक मेंढपाळ प्रकरण उघडकीस, अल्पवयीन मुलीला कामाला नेलं अन..

सहा दिवसांपूर्वी नंदुरबार येथे मेंढपाळ एक असलेल्या एका बालकाची चौकशी केल्यानंतर या बालकाची चक्क मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात विक्री केल्याचा प्रकार समोर आला होता. असाच दुसरा प्रकार आता नाशिक जिल्ह्यात समोर आलेला असून पशुपालनाच्या नावाखाली मेंढ्या चारण्यासाठी आपल्याकडे ठेवून घेतलेल्या अल्पवयीन मुलीला मारहाण करण्यात आली आणि त्यात तिचा मृत्यू झाला असे संतापजनक प्रकरण समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील माळरानावर रहात असलेल्या तुळसाबाई सुरेश आगिवले यांनी त्यांची मुलगी गौरी ( वय 10) हिला विकास सिताराम कुडणार ( राहणार शिंदोडी तालुका संगमनेर ) याच्याकडे मेंढया चारण्यासाठी तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात पाठवले होते. सुरुवातीला विकास याने व्यवस्थितरित्या तिचा सांभाळ केला मात्र मागील महिन्यात त्याने तिला प्रचंड मारहाण केली आणि तिच्या गळ्याला गळफास लावला, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे

27 ऑगस्ट रोजी मध्यरात्री विकास याने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गौरीला तिच्या घराच्या समोर नेऊन टाकले आणि त्यानंतर तिथून पलायन केले. काही वेळानंतर तुळसाबाई या बाहेर आल्यानंतर त्यांनी लाल साडीमध्ये गुंडाळलेली अवस्थेतील आपली मुलगी पाहिली आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

इगतपुरी तालुक्यातील आदिम कातकरी समाजातील चौदाशे कुटुंबीय राहत असून त्यातील अनेकजण वीटभट्टी, खडी फोडणे , मासेमारी अशा स्वरूपाचे हातावर पोट असलेले उद्योग करत असून त्यांच्या गरिबीचा फायदा घेत त्यांना काही पैशांसाठी गुलामीचे जीवन कंठीत करावे लागत आहे. आपल्या आई-वडिलांपासून दूर असलेल्या गौरीने असा कुठला गुन्हा केला की विकास कुडणार याने तिला मारहाण केली. श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रौढ व्यक्तींना जास्त रोजगार देणारी कामे उपलब्ध होत असल्याने पूर्वीच्या तुलनेत मेंढपाळ म्हणून काम करण्यास ह्या व्यक्ती तयार होत नाहीत मात्र त्यांच्या अल्पवयीन मुलांना किरकोळ आमिष दाखवून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास शेकडो गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. गोरगरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलांना हेरून त्यांना अवघ्या काही रुपयांसाठी वेठबिगार म्हणून कामाला ठेवण्यात येते आणि त्यानंतर त्यांचे किरकोळ कारणावरून शोषण करण्यात येते प्रशासनाने सदर व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.