भाजपने बारामतीत धडका मारणे सोडून द्यावे नाहीतर.., अजितदादांचा इशारा

भाजपने सध्या बारामती मतदार संघाकडे विशेष लक्ष दिले असून अजित पवार यांनी खास शैलीत भाजपला प्रत्युत्तर देताना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली त्यांचे तर डिपॉझिट जप्त झालेले आहे त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी बारामतीत धडका मारणे सोडून द्यावे नाहीतर त्यांचे डोके आदळेल , असे सुनावले आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, ‘ बारामतीत धडका मारून काहीच उपयोग होणार नाही त्यापेक्षा भाजपने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. मी माझ्या कामाची सुरुवात पहाटे लवकर उठून करतो त्यामुळे सलग सातव्यांदा मला बारामतीची जनता निवडून देत आहे. लोकांनी मला निवडून दिले म्हणून मी लोकांची कामेही करत असतो म्हणूनच बारामतीकर मला मताधिक्‍याने निवडून देतात. अनेक नेते सध्या बारामतीला भेट देत आहे . महाराष्ट्रात कुठेही फिरण्याचा अधिकार सगळ्यांना आहे मात्र जर बारामतीत धडका घेणार असाल तर तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागणार आहे ‘, असेही ते पुढे म्हणाले.

सध्याच्या सरकारवर देखील अजित पवार यांनी जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे सरकार स्थापन होऊन आत्तापर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही त्यामुळे सगळे निर्णय अधिकारी घेऊ शकत नाही. जनतेची कामे त्यामुळे खोळंबली असून अधिकाऱ्यांना देखील काय निर्णय घ्यावा हे समजत नसल्याने सरकार किती दिवस चालणार आहे ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्यासाठीचे सगळे निर्णय घेत असून मंत्रिमंडळात 20 मंत्री आहेत मात्र पुणे जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागत नाहीत असे देखील ते पुढे म्हणाले