
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सध्याच्या सरकारने प्राधान्य दिले असून महाराष्ट्रात सुमारे सातशे ठिकाणी ‘ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ‘ सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सरकार आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देण्यात येईल असे देखील त्यांनी जाहीर केले आहे.
‘ आपला दवाखाना ‘ या योजनेतून नागरिकाला आपल्या घराजवळ आरोग्य सुविधा देण्याची सरकारची योजना आहे. मुंबईत सुमारे दोनशे सत्तावीस ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार असून 2 ऑक्टोबरपासून पन्नास दवाखाने सुरू देखील करण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयाच्या बळकटीसाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू करण्यात येईल असे देखील ते म्हणाले.