आधी राजीनामा द्या अन मग काय.. , राज ठाकरेंचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षांतर्गत असणाऱ्या बाबींवर बोलण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेणाऱ्यांना खडे बोल सुनावले असून पक्षांतर्गत काही बोलायचे असेल तर माझ्याशी बोला पण हे सोडून प्रसारमाध्यमांशी जर तुम्हाला बोलायचे असेल तर आधी सरळ राजीनामा द्या, असे ठणकावले आहे.

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी केलेल्या पोस्टनंतर वसंत मोरे हे मनसेमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. मनसेचे अनेक कार्यकर्तेदेखील आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी फेसबुक ट्विटर आणि इतर सोशल मीडियाचा आधार घेतात मात्र त्यामुळे पक्षात अंतर्गत कुरबुरी असल्याची बाब देखील समोर येते म्हणून राज ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले असून त्यामध्ये , ‘ माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाटेल ते बोलायचे आणि प्रसिद्धी मिळवायची असे करणारे प्रत्येक पक्षात आहेत . माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मिडियाची लाईक्स यांनी हे सगळं होत आहे. इतर पक्षांनी अशा लोकांचे काय करावे हे हा त्यांचा प्रश्न आहे मात्र मनसेमध्ये मी हे खपवून घेणार नाही. माझ्या पक्षातल्या कुणालाही सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या आणि मग काय घाण करायची ती करा ‘ असे त्यांनी ठणकावले आहे.